तुझ्या सुगंधाहून निराळी अशी फुले मी आणू कुठली? हे फूलराणी सांग मला तू तुला फुले मी माळू कुठली? वेड तुला लागलेच माझे यात मला तर शंका नाही फक्त मला हे समजू दे मी करू तुझ्यावर जादू कुठली? कुणाकुणाची नावे घेऊ ... कुणाकुणाची नावे गाळू ...? कथा-कहाण्या अनेक माझ्या, तुला नेमकी सांगू कुठली? जरी तुझा मी कौल मागतो, प्रश्न भरोशाचा आहे हा माझी बाजू अनेकपदरी, तुझ्यापुढे मी मांडू कुठली? समीप येता कसे अचानक गमावले मी तुला, मला तू? दोष कोणता समजू माझा, चूक तुझी मी मानू कुठली? तुला हाक मी देतो तेंव्हा तुला तुझा उंबरा दिसे, मग वचन तुला मी देऊ कसले, शपथ तुला मी घालू कुठली!